शब्दमित्र - एक साहित्यिक चळवळ !

स्थापना :

'शब्दमित्र' ची स्थापना १९९६ साली नरेंद्र बोडके, अंजली कुलकर्णी, बालम केतकर, प्रियदर्शन पोतदार, सुरेश टिळेकर, मनोहर सोनवणे अशा पुण्यातील काही कवींनी मिळून केली. अंजली कुलकर्णी ह्या 'शब्दमित्र' च्या संस्थापक अध्यक्ष आहेत.

उद्दीष्ट :

लेखक, वाचक, प्रकाशक, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत या सगळ्यांना जोडणारी एक साहित्यिक चळवळ म्हणून 'शब्दमित्र' ची सुरवात करण्यात आली. गांभीर्याने लेखन, वाचन, कृती करणाऱ्या लेखक वाचकांनी एकत्र येऊन, उत्सवप्रियता आणि औपचारीकता टाळून साहित्यिक सामाजिक विषयांवर चर्चा करावी, विचारांचे आदानप्रदान, आपल्या साहित्यिक संकल्पना चर्चेद्वारे लखलखीत करून घ्याव्यात आणि परस्परांना समृद्ध करीत महाराष्ट्राची सांस्कृतिक समृद्धी बळकट करावी, वाचकांच्या रुचीचे रुपांतर अभिरुचीमध्ये व्हावे यासाठी 'शब्दमित्र' कटिबद्ध झाली.

वाटचाल आणि वैशिष्टये :

सुरुवातीला 'शब्दमित्र' ने काही अंकही प्रकाशित केले. कविवर्य वसंत बापट विशेषांक, उडिया कवी विशेषांक, महिलादिन विशेषांक असे काही दर्जेदार अंक 'शब्दमित्र' कडून निर्माण झाले. परंतु पुरेश्या निधीअभावी अंकछपाई बंद पडली. 'शब्दमित्र' चा पहिला अंक १५ ऑगस्ट १९९६ रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि 'मिळून साऱ्या जणी' मासिकाच्या संपादक विद्याताई बाळ यांच्या हस्ते प्रकाशित झाला होता. नंतर अंक बंद पडले तरी 'शब्दमित्र' चे मासिक कार्यक्रम नियमितपणे सुरु होते.

'शब्दमित्र' ने नेहमीच कार्यक्रमांच्या आयोजनात सांकेतिकतेपेक्षा वेगळे काही दिले. उदा. कविसंमेलने भरवून वीसबावीस कवींची एखादी कविता ऐकण्यापेक्षा गांभीर्याने लिहिणाऱ्या एकाच कवीला एका कार्यक्रमात बोलावून त्याची संपूर्ण कविता व त्याचे निर्मितीप्रक्रीयेविषयीचे मनोगत ऐकणे हा उपक्रम 'शब्दमित्र' ने तब्बल पावणेतीन वर्षे राबविला. यामध्ये पुणे व पुण्याबाहेरील अनेक चांगल्या कवींनी उपस्थिती दिली. उदा. सतीश काळसेकर, हेमंत जोगळेकर, अरुण म्हात्रे, अशोक बागवे, सुमती लांडे, किशोर पाठक, संगीता जोशी, नरेंद्र बोडके, अश्विनी धोंगडे, हेमा लेले, प्रियदर्शन पोतदार, अंजली कुलकर्णी, रमण रणदिवे, गणेश विसपुते, मनोहर सोनवणे, दीपक करंदीकर, मृणालिनी कानिटकर, आसावरी काकडे, रमेश वाकनीस, मनोहर लोंढे, सुदेश लोटलीकर, परेन जांभळे, पुष्पाग्रज, बालम केतकर इ.

त्याचबरोबर काही महत्वाच्या पुस्तकांवर चर्चादेखील घडवून आणली गेली. त्यामध्ये डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या 'येरवडा विद्यापीठातील दिवस' सारख्या पुस्तकावर चर्चा झाली. अशा विविध चर्चांमध्ये डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. मा. प. मंगुडकर, लक्ष्मणराव ढोबळे, डॉ. नागनाथ कोतापल्ले, डॉ. चंद्रशेखर बर्वे, डॉ. अनुराधा पोतदार, डॉ. अश्विनी धोंगडे, डॉ. नीलिमा गुंडी, विद्याताई बाळ, मेधा थत्ते, लक्ष्मण लोंढे, वसुधा सरदार, पौर्णिमा गादिया, उषा मेहता, रामदास फुटाणे, डॉ. सुलभा ब्रह्मे, अन्वर राजन असे विविध कार्यकर्ते, विचारवंत, समीक्षक सहभागी झाले. राज्यघटनेच्या ३७० व्या कलमासंदर्भातील चर्चेमध्ये मोहन धारिया, डॉ. सत्यरंजन साठे, अॅड. जया सागडे, डॉ. कुमार सप्तर्षी, भगवान दातार इ. दिग्गज सहभागी झाले होते. तसेच वसंत बापट विशेषांकाच्या प्रकाशनास स्वतः कविवर्य वसंत बापट, डॉ. गं. ना. जोगळेकर, डॉ. मा. प. मंगुडकर, प्रा. अशोक बागवे पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. साहित्यिक विषयांव्यतिरिक्त 'शब्दमित्र' मध्ये 'काश्मिर प्रश्न', 'मोलकरीण संघटनेची गरज', 'एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या मुलींच्या हत्या' असे अनेक विषय हाताळले गेले.

'शब्दमित्र' ही एक सामाजिक भान जपणारी संस्था आहे. साहित्य केवळ मनोरंजनासाठी नसून ते एक जगबदलाचे , परिवर्तनाचे माध्यम आहे, यावर 'शब्दमित्र' चा ठाम विश्वास आहे. समाजात लोकशाही मूल्ये रुजावीत, स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर समाजाची प्रतिष्ठापना व्हावी, माणसांना शांततेने, प्रेमाने, विश्वासाने समाजात जगता यावे, असा मानवतावादी संदेश देण्यास साहित्यिकाने कटिबद्ध असावे असे 'शब्दमित्र' मानतो. जग सुंदर करायचे असेल तर ते बदलले पाहिजे आणि ते बदलण्यासाठी आवश्यक भूमी साहित्याने समाजात निर्माण केली पाहिजे अशी 'शब्दमित्र' ची धारणा आहे. म्हणूनच साहित्यिक सांस्कृतिक अंगाने 'शब्दमित्र' विविध सामाजिक उपक्रमांत सहभागी होत आला आहे. उदा. गेली १५ वर्षे पुण्यात विविध संस्था/संघटना एकत्र येऊन करत असलेल्या 'लोकशाही उत्सवा' मध्ये, पहिल्या वर्षापासून 'शब्दमित्र' ने कवितांचे वैशिष्टयपूर्ण कार्यक्रम सादर केले आहेत. जसे :

याचबरोबर 'शब्दमित्र' ने वेळोवेळी नवोदित कवींना प्रोत्साहन देऊन त्यांना व्यासपीठ पुरविण्याचे काम केले. 'शब्दमित्र' च्या मंचावरुन लीनता माडगूळकर, ऋतुजा फूलकर, शशिकांत कांबळे , वैशाली पतंगे, अंजली देसाई, ज्योती सरदेसाई, प्रतिभा पवार, मीनाक्षी नवले, वैशाली मोहिते, सुहासिनी देशपांडे अशा अनेक नवोदित कवींनी आपल्या कविता सादर केल्या आहेत. नव्या कवींसाठी 'शब्दमित्र' ने वेळोवेळी कवितेची कार्यशाळा आयोजित केली आहे. त्या कार्यशाळेत डॉ. द. दि. पुंडे, डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. अश्विनी धोंगडे, रमेश धोंगडे, अरुण म्हात्रे, अंजली कुलकर्णी इ. नी मार्गदर्शन केले आहे.

१९९६ ते २००६ तब्बल दहा वर्षे इंस्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल रिसर्च या संस्थेचे तत्कालीन डायरेक्टर डॉ. मा. प. मंगुडकर यांनी संस्थेचा हॉल दरमहाच्या कार्यक्रमासाठी मोफत देऊ केला. डॉ. मा. प. मंगुडकर, रामदास फुटाणे, नरेंद्र बोडके हे संस्थेचे प्रमुख आधारस्तंभ होत.

उपक्रम :

गेल्या काही वर्षांपासून 'शब्दमित्र' ने विविध विषयांवरील अनोखे कार्यक्रम बसवून विविध संस्था, मंडळे, शाळा व महाविद्यालयांमधून ते सादर करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. त्यामध्ये खालील कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाते

'लोकायत' च्या 'मराठी भाषा विकास मंचा' च्या माध्यमातून 'शब्दमित्र' निर्मित हे कार्यक्रम सादर केले जातात.

'शब्दमित्र' चे सल्लागार डॉ. मा. प. मंगुडकर, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. नागनाथ कोतापल्ले, रामदास फुटाणे, डॉ. अश्विनी धोंगडे, हरी नरके, अन्वर राजन यांचे उत्तम मार्गदर्शन व सहकार्य 'शब्दमित्र' ला आहे. मनोहर सोनवणे, दीपक करंदीकर, मृणालिनी कानिटकर, वैशाली मोहिते, राजीव पाटसकर या कवींचे मोलाचे योगदान 'शब्दमित्र' ला मिळते आहे.