अंजली कुलकर्णी यांचे सामाजिक काम

१९७५ चं वर्ष अंजली कुलकर्णी यांच्या आयुष्यातलं एक महत्वाचं वर्ष होतं. साहित्याची आवड जपण्याबरोबरच त्या आसपास घडणाऱ्या घटना, वृत्तपत्रांत येणाऱ्या बातम्या घटनांकडे त्या कुतूहलाने बघत होत्या. जगाकडे पाहण्याचा त्यांच्या जीवनाचा आरंभबिंदू आणि देशात, महाराष्ट्रात अवतीभवती सामाजिक, राजकीय आंदोलनांनी भारलेला आसमंत असा एक योगही जुळून आलेला होता. युवक क्रांती दल, एस. एफ. आय. , ग्रंथाली, नंतर नामांतर अशा विविध चळवळींनी महाराष्ट्र गजबजून गेला होता. विशेषतः आणीबाणीच्या काळात अंजली कुलकर्णी यांना भोवतीच्या घटनांचं भान तीव्रतेनं यायला लागलं. युवक क्रांती दलाचे डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. अरुण लिमये, डॉ. रत्नाकर महाजन, डॉ. उर्मिला सप्तर्षी यांच्या संपर्कात त्या आल्या. युवक क्रांती दलाच्या विविध शिबिरांमधून त्या राम बापट, कुमार सप्तर्षी आदींचे विचार ग्रहण करू लागल्या. युक्रांदच्या अभ्यास शिबिरांमधून नानासाहेब गोरे, दादा धर्माधिकारी, राम बापट इ. ची मांडणी त्यांना प्रभावित करत असे. त्यावेळेस त्यांच्या आगेमागे युक्रांदमध्ये प्रवेश केलेल्या नीलम गोऱ्हे, झेलम गोऱ्हे, अन्वर राजन, तिलोत्तमा देशपांडे, मार्कंडेय पती-पत्नी, उषा चौकसे, मंगल खिंवसरा, शांताराम पंदेरे, अनिल गायकवाड अशा अनेकांशी त्यांची मैत्री झाली.

समाजवादी चळवळीशी, समाजवादी तत्त्वज्ञानाशी ओळख झाली तेव्हा स्वातंत्र्य, समता, बंधुता, जाती-धर्म-लिंग निरपेक्षता, बुद्धिप्रामाण्यवाद, वैज्ञानिक दृष्टीकोन ही मूल्ये आपल्या वृत्ती-प्रवृत्तीशी जुळणारी आहेत असे त्यांना जाणवले. युक्रांदच्या अनेक शिबिरांपैकी लोहिया वसतिगृहातील, ज्यात आणीबाणी विषयीची बातमी वादळासारखी आली, ते शिबिर तसेच प्रत्यक्ष आणीबाणीकाळातील लोणावळा येथे झालेले गुप्त शिबिर, तसेच १९७७ साली युक्रांदच्या फुटीचा निर्णय झालेले ऐतिहासिक शिबिर ही शिबिरे विशेष संस्मरणीय आहेत.

१९७७ साली फुटीनंतरच्या युक्रांदमध्येही अंजली कुलकर्णी होत्याच. तेव्हा अजित सरदार युक्रांदचे मुख्य कार्यवाह, तर अंजली कुलकर्णी महाराष्ट्राच्या सचिव होत्या. त्या काळात विशेष करून अजित आणि वसुधा सरदार, नीलम गोऱ्हे, विद्या कुलकर्णी, प्रभाकर आणि अरुणा भट, प्रेमा गोरे, मार्कंडेय हे पुणे युक्रांदशी निगडीत कार्यकर्ते होते. वसुधा सरदार आणि नीलम गोऱ्हे यांचा त्या काळात अंजली कुलकर्णींवर मोठा प्रभाव होता.

वसुधा सरदार त्या काळात शिवाजी नगर येथील एका वस्तीत काम करावयास जात. तेथील स्त्रियांची एक संघटना त्यांनी बांधली होती. युक्रांदची अभ्यास शिबिरे इ. उपक्रम सुरूच होते. त्याच काळात तत्कालीन कामगार मंत्री एन. डी. तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या कामगार परिषदेतील अंजली कुलकर्णी यांचे भाषण व त्यांनी सादर केलेल्या कामगार-गीतांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. अप्पासाहेब भोसले, वसुधा सरदार, अमरजा पवार इ. च्या उपस्थितीत हे शिबिर पार पडले होते.

१९८०-८२ या काळात समर नखाते, माधुरी पुरंदरे, अनिल झणकर, माधुरी टाकसाळे, भारत अवचट अशा अनेक युवकांनी सुरु केलेल्या 'माध्यम' या पथनाटय चळवळीत त्या सहभागी झाल्या. हुंडाबळी, अंधश्रद्धा अशा त्यावेळच्या प्रचलित प्रश्नांवर ही पथनाट्ये प्रत्यक्ष रस्त्यावर सादर केली जात. त्याचबरोबर तेव्हा मुंबईत गाजत असलेल्या 'मुलगी झाली हो' या ज्योती म्हापसेकर लिखित नाटकाचे काही प्रयोग पुण्यात अंजली कुलकर्णी इतर काहीजणींबरोबर करीत असत.

१९८० च्या सुमारास अभिनव कला विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे काही प्रश्न, कॉलेजच्या प्राचार्यांविरुद्धच्या मुलांच्या तक्रारी युक्रांदपर्यंत आल्या. उदा. त्यावेळी अभिनव कला विद्यालयात एक वर्ष विद्यापीठाची परीक्षा तर एक वर्ष महाविद्यालयाची परीक्षा अशी व्यवस्था होती. महाविद्यालयाच्या अखत्यारीतील लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये पक्षपात होत असल्याच्या मुलांच्या तक्रारी होत्या. तसेच फीवाढ आणि सुविधांचा अभाव हेदेखील प्रश्न होतेच. त्यावेळी अंजलीताई आणि तिलोत्तमा देशपांडे यांनी अजित सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या विद्यार्थ्यांची संघटना बांधून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलन छेडले. परंतु, एक दिवस विद्यार्थ्यांशी चर्चा सुरु असताना एक पत्रकार म्हणवणारे गृहस्थ मध्येच आले आणि एका विद्यार्थ्याचे बखोट धरुन "तू त्या 'जोशी अभ्यंकर' खटल्यात जक्कल सुतार बरोबर होतास न ? मला माहिती आहे तुझा त्या प्रकरणाशी संबंध आहे." असे म्हणताच तो मुलगा व इतर मुलेही टरकली. त्या वर्षी पुण्यात 'जोशी अभ्यंकर' खून प्रकरण अत्यंत गाजत होते व आरोपी जक्कल सुतार इ. अभिनव कला महाविद्यालयातच शिकत असल्याचे बाहेर आले होते. त्यानंतर विद्यार्थी भीतीने संघटनेकडे वळले नाहीत. परंतु प्राचार्यांनी फीवाढ रद्द केली आणि विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधांचा अंतर्भाव त्यांच्या नियोजनात केला. म्हणजे त्या लढ्याला अंशतः यश मिळाले.

दरम्यानच्या काळात १९८२ साली अंजली कुलकर्णी यांचा विवाह श्री. अशोक कुलकर्णी यांच्याबरोबर झाला आणि त्या पुण्याजवळ हडपसर येथे राहायला गेल्या. त्यावेळी हडपसर हा आजच्यासारखा विकसित भाग नव्हता. एखाद्या खेडयाप्रमाणे त्याचे स्वरूप होते. इंडस्ट्रीअल इस्टेट मुळे मुख्यतः कामगारवर्ग आणि आधीपासूनचे स्थानिक रहिवासी तिथे राहत असत. नीलम गोऱ्हे यांचा दवाखाना व स्त्री आधार केंद्राचे ऑफीस हडपसरलाच होते. त्यामुळे अंजली कुलकर्णी, नीलम गोऱ्हे ह्यांच्या तेथील कामाशी समरस झाल्या. हडपसर, मांजरी, उरळीकांचन, ससाणेनगर, साडेसतरानळी, पंधरा नंबर इ. भागांमध्ये स्त्री आधार केंद्राच्या कामात त्या सहभागी झाल्या.

पुण्यात त्या काळात मंजुश्री सारडा, शैला लाटकर खून प्रकरण, 'इन्साफ का तराजू' चित्रपटातील स्त्रीविषयक आक्षेपार्ह दृश्य यांच्या विरोधात स्त्री संघटनांनी आवाज उठवला होता. या सर्व मोर्चा, निषेध सभा, पोस्टर प्रदर्शन यात अंजलीताई होत्याच. हडपसर मधील वस्त्या-वस्त्यांतून त्यांनी 'मंजुश्री सारडा खून प्रकरणासंदर्भात तसंच आरोग्य विषयक पोस्टर प्रदर्शन लावलं होतं. हडपसर मध्ये त्या राहत असलेल्या ठिकाणी बायकांचा एक गट त्यांनी स्थापन केला होता. त्यामध्ये 'माणसं' , 'बलुतं', 'मी तरुणी' यासारख्या पुस्तकांचं सामुदायिक वाचन, चर्चा, पथनाटय बसविणे, वस्तीतल्या मुलांचा अभ्यास घेणे अशा स्वरूपाचं काम सुरु होतं. कालांतराने हडपसरमधून त्या पुण्याच्या गोखलेनगर भागात राहायला गेल्या आणि हडपसर मधील त्यांचा काम संपलं.

गोखलेनगर मध्ये त्या मोफत कायदा सल्ला केंद्र चालवीत असत. नुकतेच १९८४ साली त्यांचे कायद्याचे शिक्षण पूर्ण झाले होते. विशेषतः कामगार कायदे आणि स्त्रीविषयक कायद्यांवर तेव्हा त्या काम करीत असत. स्त्रियांना त्यांचे कायदेशीर हक्क आणि कर्तव्यं समजली पाहिजेत या हेतूने त्यांनी स्त्रीविषयक कायद्यांवर काही शिबिरंही युवतींसाठी घेतली होती.

त्यानंतरच्या काळात पुणे आणि महाराष्ट्रात स्मिता हेंद्रे, अमृता देशपांडे अशा अनेक केसेसमध्ये एकतर्फी प्रेमातून, मुलीकडून मिळालेल्या नकारामधून मुलींवर केलेले प्राणघातक हल्ले, चेहेऱ्यावर अॅसिड फेकणे, हत्या करणे अशा घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अंजली कुलकर्णी यांनी विविध महाविद्यालयीन गटांमध्ये जाऊन मुलामुलींमध्ये या विषयावर जागृती, चर्चा केल्या होत्या. लोकसत्ताच्या पुरवणीत आणि इतरही अनेक नियतकालिकांमध्ये त्यांचे याविषयावरील लेख प्रसिद्ध झाले होते. मुलींच्या नकार देण्याच्या अधिकाराचा आदर मुलांनी केला पाहिजे, त्यासाठी त्यांची आणि एकंदरच समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. मुलामुलींची जडणघडण करताना, त्यांना वाढवताना विषमतावादी दृष्टीकोनातून न बघता समान पातळीवरून दोघांना वाढविण्याची गरज त्या प्रत्येक भाषणात व्यक्त करीत असत. मुलामुलींचे तसेच पालकांचे समुपदेशन करणाऱ्या अनेक कार्यशाळा त्यांनी या काळात घेतल्या.

यानंतर १९९५ च्या सुमारास अंजलीताई पुनश्च एकदा डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या संपर्कात आल्या. त्यावेळी डॉ. सप्तर्षी यांनी 'सत्याग्रही विचारधारा' हे मासिक सुरु केले होते. त्यावेळच्या कार्यकारी संपादक नीला शर्मा यांना संपादकीय मदत करण्यासाठी अंजलीताई 'सत्याग्रही'शी निगडीत झाल्या. त्या, त्यानंतर सातत्याने आजतागायत सत्याग्रहीशी संबंधीत आहेत. मधल्या काळात २००० ते २००३ मध्ये त्यांनी स्वतः कार्यकारी संपादक म्हणून काम केलं. आज त्या सत्याग्रहीच्या सल्लागार समितीवर आहेत.

२००२ साली डॉ. सप्तर्षी यांनी युक्रांदचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला, तेव्हाही अंजलीताई महाराष्ट्राच्या सचिव म्हणून नव्या युक्रांदमध्ये सहभागी झाल्या. या पुनरुज्जीवित युक्रांदच्या प्रसारासाठी त्या डॉ. सप्तर्षींबरोबर संपूर्ण मराठवाडा, बेळगाव, सातारा, सांगली, नागपूर इ. दौऱ्यांमध्ये सहभागी झाल्या.