कविता आणि मी !

कविता मी जगते आहे जाणत्या वयापासून. कविता भोगते आहे आजपर्यंत घेतलेल्या प्रत्येक श्वासागणिक. मला आठवतंय तेव्हापासून म्हणजे वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षापासून मी सतत भव्यदिव्यतेनं, उदात्त कल्पनांनी भारलेली असायची. त्यातला भाबडेपणा आज वयानं थोडा कमी झाला असेल, पण अजूनही हे भारलेपण मला सोडून गेलेलं नाही. उत्कटता आणि ज्ञानाची एक मोठी लालसा माझ्यात लहानपणापासून वसते आहे. जगातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मला लहान मुलासारखं कुतूहल वाटत असतं, ते आजही फारसं कमी झालेलं नाहीये.

एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सहा भावंडांपैकी पाचव्या आणि पाच बहिणींपैकी चौथ्या क्रमांकाची मी मुलगी. पण बेताची परिस्थिती असूनही आईवडिलांनी पाच मुली म्हणून कधी दुस्वास केला नाही की कमी लेखलं नाही. त्यावेळी कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया आज इतकी सोपी नव्हती आणि माझ्या आईची तब्येत ती शस्त्रक्रिया करण्याइतकी चांगली नव्हती, ही गोष्ट ती सहजपणे, विना-पश्चात्तापाच्या सुरात सांगत असे.

'आता यांचं कसं व्हायचं' अशी काळजी आईवडिलांना निश्चित वाटत असेल, पण ती त्यांच्या चेहेऱ्यावर, बोलण्यातून कधीच जाणवली नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही प्रसन्न, समाधानी आणि आनंदी असायचं आमचं घर. इतरांना मात्र ही काळजी असावी. 'यांची आता फजिती होणार' हे गृहित धरुन ती बघाया ते आतुर असावेत; पण तसं काहीच घडलं नाही. आम्ही सगळी भावंड अभ्यासात हुषार होतो. सुविद्य, सुसंस्कृत कुटुंब म्हणून परिसरात आम्हाला ओळखलं जाई.

आईवडील दोघेही तीव्र बुद्धिमत्ता असलेले. आई मॅट्रिकला जुन्नर तालुक्यात प्रथम आलेली. शाळेत सतत प्रथम. ज्येष्ठ कवी शंकर वैद्य आणि आई एका वर्गात शिकलेले. ते म्हणायचे, "तुझी आई शाळेत येण्याआधी हा संस्कृत मध्ये पहिला येणार, दुसरा गणितात पहिला येणार असं अगदी ठरलेलं असे. पण तुझी आई आली आणि तिनं साऱ्या मुलांची मोनोपॉली मोडून काढली. सर्व विषयात तीच सर्वप्रथम." वडिलांना प्रतिभेची देणगी. तत्वज्ञान, विज्ञान, जुने इंग्रजी व संस्कृत वांङ्मय याचं त्यांचं चांगलं वाचन, चिंतन, व्यासंग. मोठ्या बहिणींची मेडिकलची, मानसशास्त्राची पुस्तकं ते उत्सुकतेनं वाचून काढत. त्याचं उत्तम विश्लेषण आणि संश्लेषणही करीत. आजही स्टीफन हॉकिंग सारख्या शास्त्रज्ञाची पुस्तकं वाचून त्यांना ईमेलवर पत्र लिहिण्याईतकी जिज्ञासा त्यांच्यात वयाच्या ९१व्या वर्षी शाबूत आहे. ते अत्यंत भावनाशील, संवेदनाशील तर आई व्यवहारकुशल, सहृदय. त्या काळाच्या मानाने दोघेही बरेच आधुनिक. फार रुढी-परंपरांच्या, देवदेवाच्या, कर्मकांडांच्या आहारी ते गेले नाहीत; पण पूर्णपणे त्यांनी ते तोडूनही टाकले नाही.

घरची परिस्थिती बेताची पण तरीही मी खूप आनंदात असायची कायम. आज बालपण आठवलं की एकही कटू आठवण येत नाही. कारण एकतर कमतरतांची उणीव तेव्हा जाणवत नव्हती, किमान गरजा भागवल्या जात होत्या आणि दुसरं म्हणजे मश्गुल होण्यासाठी स्वतःचं असं स्वतंत्र मनोविश्व होतं; ज्याची मी आणि मीच अनभिषिक्त सम्राज्ञी होते. वाचनाची जबरदस्त ओढ होती. घरात पुस्तकांची रेलचेल होती. विविध खेळांत नैपुण्य होतं. मनसोक्त खेळायला मिळत होतं.

कविता वाचण्याचा, त्याही मोठ्ठ्यांदा मला लहानपणापासून छंद होता. गच्चीवर जाऊन नाट्यमय पद्धतीनं, मोठ्ठ्यांदा कविता, हिंदी - उर्दू शेर शायरी स्वतःशीच म्हणणं, प्रसिद्ध नाटकांमधले, कथांमधले उतारे स्वतःशीच वाचणं याची एक आवड होती. साहिर लुधियानवी, सरदार जाफरी, गालीब, मीर-तकी-मीर, मीनाकुमारी, निदा फाजली यांची पुस्तकं मिळवून वाचायची - त्यातलं कुर्बान होऊन जाणं, शहीद होऊन जाणं विलक्षण भावायाचं. त्या काळात गोविंदाग्रज, भा. रा. तांबे, माधव जुलियन, कुसुमाग्रज, इंदिरा संत, शांता शेळके यांचे कवितासंग्रह मी शाळेच्या ग्रंथालयात बसून वाचायची, आवडणाऱ्या कविता एका वहीत उतरवून काढायची. नंतर बालकवी, मर्ढेकर, विं. दा. करंदीकर, पाडगावकर, बापट, नारायण सुर्वे, महानोर वाचले. साठोत्तरी कवितेची ओळख थोडी उशिरा कविता लिहायला लागल्यानंतर, एम. ए. चा अभ्यास करताना झाली. कवितेव्यतिरीक्त कथाकादंबऱ्या, चरित्र आत्मचरित्र आणि बी. ए. ला तत्वज्ञान होतं त्यामुळे तत्वज्ञानाची पुस्तकं भरपूर वाचली. ७७-७८ च्या सुमारास नेमाडेंचं 'कोसला' वाचलं आणि झपाटूनच गेले. हे काहीतरी भन्नाट आहे, मुळापासून हलवणारं आहे असं लक्षात आलं परंतु कोसलाने वाङ्मयीन विश्वात उलथापालथ घडवली आहे किंवा हा एक मैलाचा दगड समजला जातो वगैरे, याची गंधवार्ताही त्यावेळी नव्हती. तेव्हाचे माझे सर्वात आवडते लेखक होते अरुण साधू आणि अनिल बर्वे. अरुण साधूंच्या 'मुंबई दिनांक' , 'फिडेल, चे आणि क्रांती', 'सिंहासन', 'शोध' आणि अनिल बर्वेंच्या 'डोंगर म्हातारा झाला' , 'रोखलेल्या बंदुका आणि उठलेली जनता' सारख्या कादंबऱ्यांमधून मला माझ्या आतल्या भावविश्वाशी काहीतरी जोडलं जातंय अशी जाणीव होत असे.

या सगळ्यातून काहीतरी झिरपत झिरपत माझ्या नेणीवेत साठत होतं. कधीतरी एफ. वाय. - एस. वाय. च्या सुमारास माझ्या जाणिवेच्या कुठल्यातरी अज्ञात बिंदूला स्पर्श झाला आणि माझ्यातली कविता अकस्मात जागी होऊन उठली. माझ्यामध्ये कवितेचं स्फुल्लिंग पेटलं. ती कविता खूप ग्रेट नव्हतीच पण अगदी टाकाऊही नव्हती.

त्याचबरोबरीनं मी आसपास समाजात घडणाऱ्या, वृत्तपत्रांत वाचायला मिळणाऱ्या घटनांकडेही कुतूहलानं पाहत होते. १९७५ पासूनचा काळ हा माझा कुतूहलानं जगाकडे पाहण्याचा आरंभबिंदू आणि हाच काळ देशात, महाराष्ट्रात, अवतीभवती संपूर्ण वातावरण हलून निघण्याचा काळ होता. युक्रांद, एसएफआय, ग्रंथाली, नंतर नामांतर अशा विविध चळवळींनी महाराष्ट्र गजबजून गेला होता. विशेषतः आणीबाणीच्या काळात मला या भोवती घडणाऱ्या घटनांचं भान यायला लागलं. माझी शाळेतली जिवलग मैत्रिण तिलोत्तमा (आता स्मिता देशपांडे) हिला चांगली राजकीय जाण होती. आमच्या गप्पा-गोष्टींमध्येही प्रामुख्यानं हा विषय असायचा. त्यातून आम्ही दोघी युवक क्रांती दल या तेव्हाच्या अत्यंत प्रभावी युवक चळवळीकडे ओढल्या गेलो. युक्रांदच्या विविध शिबिरांमधून डॉ. कुमार सप्तर्षी, अरुण लिमये, रत्नाकर महाजन, अन्वर राजन यांच्या संपर्कात आलो. राम बापट, दादा धर्माधिकारी, नानासाहेब गोरे इ.ची मांडणी ऐकायला मिळाली. मनात विचारांची चक्र सुरु झाली. समाजवादी तत्वज्ञानाची ओळख झाली तेव्हा हे आपल्या प्रकृतीतच आहे, असं मला पटकन जाणवलं. ७७ साली फुटल्यानंतरच्या युक्रांदमध्येही मी होतेच. त्या काळात अजित आणि वसुधा सरदार, नीलम गोऱ्हे यांचा माझ्यावर मोठा प्रभाव होता. आजही मी डॉ. कुमार सप्तर्षी आणि इतरांनी revive केलेल्या युक्रांदशी निगडीत आहेच.

१९७५ हे साल सगळ्याच दृष्टीनं फार महत्वाचं होतं. युनोनं आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित केलं होतं आणि तेव्हापासून स्त्रीमुक्तीची चळवळ आणि तिचे पडसाद जगभर, देशभर, राज्यभर उमटत होते. माझ्यापुरतं या काळाविषयी बोलायचं तर युक्रांदच्या माध्यमातून, नारी समता मंचाच्या माध्यमातून मी स्त्रीमुक्तीच्या अनेक कार्यक्रमांत सहभागी होत होते. मुंबईत तेव्हा ज्योती म्हापसेकरांचं 'मुलगी झाली हो' नाटक गाजत होतं. पुण्यात आम्ही काहीजणी हे नाटक करत होतो. समर नखाते, माधुरी पुरंदरे यांच्या 'माध्यम ग्रुप' मधूनही मी अंधश्रद्धा, हुंडाबळी इ. विषयांवरच्या पथनाट्यात सहभागी होत होते. त्याच काळात मंजुश्री सारडा, शैला लाटकर खून खटले, 'इन्साफ का तराजू' चित्रपटामधील आक्षेपार्ह दृश्य या विरोधात स्त्रीसंघटनांनी आवाज उठवला होता. मंजुश्री सारडा प्रकरणासंबंधी स्त्री आधार केंद्रानं तयार केलेलं एक पोस्टर प्रदर्शन मी हडपसर मध्ये वस्त्यावस्त्यांमध्ये लावलं होतं. हडपसर मध्ये मी राहत असलेल्या ठिकाणी मी बायकांचा एक गट स्थापन केला होता. तिथे आम्ही अनिल अवचटांचं 'माणसं' , छाया दातारांचं 'मी तरुणी' अशा पुस्तकांचं सामुदायिक वाचन व इतर विषयांवर चर्चा करत असू, छोटी छोटी पथनाट्य बसवत असू. संध्याकाळी बँकेतून आले की मी वस्तीतल्या मुलांचा अभ्यास घेत असे. नंतरही १९९५ च्या सुमारास मी पुन्हा डॉ. सप्तर्षींच्या सान्निध्यात आले, सामाजिक प्रश्नांशी जोडली गेले.

परंतु मी सातत्यानं कार्यकर्ती म्हणून वावरले नाही. तो माझा पिंड नव्हता असे नाही पण नोकरी आणि लग्नानंतरचे घरातील वातावरण यामुळे कार्यकर्ती म्हणून माझी घडण झाली नाही. शिवाय माझ्या व्यक्तित्वातील अंतर्मुखता आणि बहिर्मुखता या आलटून पालटून येणाऱ्या फेजेसमुळेही मी त्यात सातत्य राखू शकले नाही. मात्र चळवळींच्या जवळ असल्यामुळे माझी वैचारिक जडणघडण एका विशिष्ट पद्धतीनं झाली, एवढं मात्रं खरं.

दरम्यानच्या काळात माझं कवितालेखन सुरूच होतं. पूर्वसुरींच्या कवितेचे संस्कार माझ्यावर झाले होतेच.

परंतु माझ्यावर खरे संस्कार झाले ते साठोत्तरी कवितेचे. नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, महानोर, ग्रेस मी महाविद्यालयात वाचले होते. सुर्व्यांची प्रखर सामाजिक जाणीव आणि महानोरी शैली, शब्दकळा यांच्या मी प्रेमातच पडले होते. ढसाळांच्या कविता मला खुणावत होत्या पण समजावून घेताना कठीण जात होते. ग्रेस मात्र मला एका मर्यादेपर्यंत ओढून घेत. कोल्हटकर, नेमाडे, चित्रे, तुलसी परब, गुरुनाथ धुरी, पु. शि. रेगे, डहाके, काळसेकर, नारायण कुलकर्णी कवठेकर, यांच्या कवितेची ओळख थोडी उशिरा कविता लिहायला लागल्यानं झाली; पण या कवितेनं माझ्या कविताविषयक जाणिवा विकसित होण्याची प्रक्रिया सुरु झाली. कविता वाचनाच्या निमित्ताने शंकर वैद्य, सरोजिनी वैद्य, उषा मेहता, रा. ग. जाधव, नारायण कुलकर्णी कवठेकर, प्रभा गणोरकर, डहाके, अरुणा ढेरे, नरेंद्र बोडके, अरुण म्हात्रे, नीरजा, प्रज्ञा, आसावरी काकडे, रामदास फुटाणे, मनोहर सोनावणे अशा मौलिक ओळखी झाल्या. नव्या गोष्टी कळल्या. साहित्यविषयक चर्चा ऐकायला मिळाल्या. जाणिवांचा परीघ विस्तारत गेला.

माझ्या आधीपासून लिहित्या असणाऱ्या कवयित्रींच्या कवितांशी माझं नातं तर अगदी आपसूकच जुळलं. अरुणा ढेरे ( हे नाव सर्वप्रथम; कारण कॉलेज मध्ये असतांना थोड्या सिनियर असलेल्या अरुणा ढेरेंचं नाव त्यावेळी लिहिणाऱ्या तरुण कवी-कवयित्रींमध्ये मी सर्वप्रथम ऐकलेलं होतं. त्याही काळात त्यांच्या कवितेचं गारुड होतंच.) , रजनी परुळेकर, मल्लिका अमरशेख, प्रभा गणोरकर, अनुराधा पाटील, अश्विनी धोंगडे, ज्योती लांजेवार आणि कविता लेखनात समकालीन असणाऱ्या आसावरी काकडे, प्रज्ञा, नीरजा यांच्या कवितांशी कुठेतरी धागा जुळत असल्याचा प्रत्यय वेळोवेळी येत गेला. आज लिहिणाऱ्या कवयित्रींमध्ये प्रज्ञा दया पवार हिची कविता मला मनस्वी भावते. प्रज्ञामध्ये उत्कटता, झपाटलेपण, वास्तवाचे प्रगल्भ आकलन आणि आकृतिबंधावरची घट्ट पकड असा दुर्मिळ संयोग आहे असे मला वाटते.

नोव्हेंबर १९९५ मध्ये माझा पहिला (वाहिला) कवितासंग्रह 'मी एक स्त्रीजातीय अस्वस्थ आत्मा' प्रकाशित झाला. लगोलग १९९७ मध्ये 'संबद्ध' हा दुसरा संग्रह आला. विशेष म्हणजे आपल्या कविता अशा संग्रहाच्या रुपाने पहायला मिळतील एवढीसुद्धा आशा मनात नसतांना दोन्ही संग्रह आले आणि त्यांना राज्यशासनाच्या पुरस्कारासहित इतरही महत्वाच्या संस्थांचे पुरस्कार मिळाले. नंतर २००९ मध्ये माझा तिसरा 'बदलत गेलेली सही' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. माझ्या कवितांवर माझे आवडते समीक्षक रा. ग. जाधव, म. द. हातकलंगणेकर, नरेश कवडी, आनंद पाटील, अनुराधा पोतदार, अश्विनी धोंगडे, नरेंद्र बोडके, सुहासिनी किर्तीकर, आसावरी काकडे, नीलिमा गुंडी, रुपाली शिंदे इ. मान्यवरांनी लिहिलं.

कवितेबरोबरच माझे 'हृदयस्पर्शी' आणि 'संभ्रमाच्या पाण्यात गटांगळया' हे चिंतनपर ललित लेखांचे संग्रह आले. विशेषतः 'संभ्रमाच्या पाण्यात गटांगळया' या पुस्तकातले लेख मला स्वतःला आवडले आहेत. यामध्ये मी मानवी जीवनाच्या, सृष्टीच्या मुलाशी असलेलं काही शोधण्याचा प्रयत्न माझ्यापरीनं केला आहे. रविंद्र पिंगे यांनी प्रस्तावनेत म्हटलं आहे की, " 'इंद्रियातीत' हा अंजलीचा लेख मी नीट आकलन व्हावं म्हणून परत परत वाचला आणि अखेर थबकलो. मला अचंबा वाटला की 'ज्ञान' या विराट विषयाकडे ही वळलीच कशी ?". हे पुस्तक ज्या ज्या चांगल्या लेखक वाचकांनी वाचले त्यांनी ते आवडल्याचं आवर्जून सांगितलं, परंतू जाणकारांचं या पुस्तकाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत मला वाटते, एवढं खरं. याचबरोबर माझी 'स्त्रीत्वाचा शोध' आणि 'स्त्री प्रश्न: एक आवर्त' ही पुस्तकंही प्रकाशित झाली. त्यांची शीर्षकं आशयाचा गाभा स्पष्टं करणारी आहेत.

तसंच मी तीन पुस्तकांचं संपादन केलं आहे. 'रक्तहीन क्रांती' (१९७७), 'अस्वस्थ शतकाच्या कविता' (१९९९) आणि 'समग्र' (नरेंद्र बोडके यांची समग्र कविता - २०१२), याशिवाय रशियन लेखक निकोलीय अस्रोवस्की यांच्या 'काक झकल्यास स्राल' या कादंबरीचं मी मराठी संक्षिप्तीकरण 'पोलादाला चढले पाणी' या नावानं केलं आहे. माझा 'रात्र, दुःख आणि कविता' हा याच तीन आशयसूत्रांभोवती असणारा कवितासंग्रह बहुधा या वर्षात प्रकाशित होईल. माझ्या काही कवितांचे हिंदी (निरंजन उजगरे), इंग्रजी (निरंजन उजगरे / नरेंद्र बोडके), नेपाळी (सुधा एम. राय) या भाषांमध्ये अनुवाद झाले. ते साहित्य अकादमीच्या 'इंडियन लिटरेचर' आणि 'समकालीन साहित्य' च्या अंकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. इंग्रजी व नेपाळी अनुवादाची पुस्तके बहुधा प्रकाशित होतील. माझा 'बदलत गेलेली सही' हा संग्रह जून २०१३ पासून ३ वर्षांसाठी पुणे विद्यापीठाच्या एम. ए. मराठी स्वायत्त अभ्यासक्रमात समाविष्ट झालेला आहे. हे काम फार मोठ्ठं आहे असं नाही परंतु मी एवढयाही गोष्टीची अपेक्षा केली नव्हती, कारण एका जुनाट विचाराच्या घरात लग्नं, नोकरी, संसारचक्र असं एक चाकोरीबद्ध जीवन दरम्यानच्या काळात सुरु झालेलं होतं

माझ्या मध्ये असलेल्या एका उन्मुक्तपणाला लग्नानंतर जबरदस्त धक्के बसायला सुरुवात झाली. लग्नानंतर प्रथमच मला जाणवलं की आपण 'मुलगी' आहोत म्हणून, आपण 'स्त्रीसुलभ' समजल्या जाणाऱ्या काही गोष्टी केल्या पाहिजेत किंवा टाळल्या पाहिजेत. उदा. रविवार सकाळ मध्ये एकदा माझी कथा 'अंजली कुलकर्णी' या नावानं छापून आली तर माझ्या सासरी गहजब उडाला. नावामागे सौ. न लावणं आणि मध्ये नवऱ्याचं नाव न लिहिणं हा मोठाच गुन्हा ठरला. नवऱ्याचं नाव लिहिल्याशिवाय माझ्या अस्तित्वाला काहीच का अर्थ नाही हा माझ्या उन्मुक्ततेला पडलेला पहिला तिढा होता. असे बरेच टक्केटोणपे खात गृहकृत्यदक्ष गृहिणीच्या पदाच्या जवळपास मी पोहोचले.

पण या सगळ्यामध्ये मी खूप अस्वस्थ असायचे. आपल्या वेगळेपणाची जाणीव मला सतत टोचायची. आपल्याला इतर चारचौघींप्रमाणे केवळ संसार करण्यात का नाही रस वाटत ? ऑफीसमधल्या मैत्रिणींचे जगण्याविषयीचे, मूल्यांविषयीचे, धर्माजातींविषयीचे, नैतिकतेविषयीचे विचार ऐकले की मला आश्चर्य वाटायचं. धीटपणे, मोकळेपणानं जगणाऱ्या सहकारी मैत्रिणीविषयी त्यांना एवढा आकस, राग का असा प्रश्न पडायचा. हे मलाच का टोचतं हे ही मला छळायचं. त्या काळात अस्वस्थपण असं सतत खदखदत असायचं. तेच कवितेतून व्यक्त होत गेलं. बालपणापासून असलेली भव्य-दिव्यतेची ओढ, तारुण्यातल्या कुर्बानीचं आकर्षण, रूढ व्यवस्था नाकारणाऱ्या समाजवादी तत्वज्ञानाची ओळख, लग्नानंतरच्या वास्तवाशी करावा लागणारा सामना, भोवताली रमलेल्या आणि पिचणाऱ्या स्त्रिया आणि अंतर्यामीच्या उन्मुक्ततेमुळे सतत वाटणारा 'एलियन'पणा असे पिळे असलेलं एक अनुभवविश्व मला खुणावू लागलं.

या अनुभवाविश्वाला आणखी एक पदर आहे. सगळ्यांत जगत असतांना मी, माझ्यातली एक वेगळी मी सतत या सगळ्या पलीकडचं आयुष्य जगत असते किंवा खरं तर जगत नसतेच. व्यावहारिक जीवन सुरु असतांना, अगदी गळ्यापर्यंत बुडाले आहे, असं वाटत असतांनाच माझ्यामध्ये या सगळ्यापासून अलिप्त, कशाचंच काही लागतं नसणारा, सुखदुःख नसणारा, तटस्थ, आनंददुःख या भावनांपासून मुक्त, सगळ्या लीप्ताळ्या-गोतावळ्यापासून मुक्त असा एक आत्मा मनसोक्त विहार करत असतो. त्याचं अस्तित्व मला स्पष्ट जाणवतं.

माझ्यापुरतं, मी स्त्रीवादी कविता लिहिणं अपरिहार्य होतं, कारण स्त्रीवाद हा माझ्या वैचारिक भूमिकेचाच, माझ्या जडणघडणीचाच एक भाग होता. ती मी किती समर्थपणे लिहिली ते मला ठाऊक नाही, पण ती मला लिहावीच लागली.

मला असं वाटतं की स्त्री उच्चशिक्षित असो की अशिक्षित, उच्चवर्गीय असो वा कनिष्ठवर्गीय; जात, धर्म, वर्ग, देश, प्रदेश कुठलाही असो स्त्री म्हणून एक स्त्रीविशिष्ट जगणं प्रत्येकीच्या वाट्याला येत असतं आणि त्याचे काही तिढे असतातच. जसं ग्रामीण भागातल्या माणसाचं, शेतकऱ्याचं, दलिताचं, कामगार, वेश्येचं म्हणून किंवा अगदी एखाद्या कॉर्पोरेट कंपनीतल्या सीईओचं म्हणून एक जगणं आणि त्याचं एक वेगळं अनुभवविश्व असतं आणि ते साहित्यातून यायला हवं असं आपण म्हणतो, तसं स्त्रीयांचंही वेगळं संवेदन साहित्यात यायला हवं.

मात्र स्त्रीवाद मानतो त्याप्रमाणे स्त्रीवादाचं अंतिम उद्दिष्ट मानवमुक्ती हेच आहे. आपल्याला प्रिय असलेली जीवनशैली निवडता येण्याचं स्वातंत्र्य, आपली स्वप्नं, आपल्या आशा आकांक्षा साकार करण्यासाठीचा मुक्त अवकाश लाभण्याचं स्वातंत्र्य एक माणूस म्हणून स्त्रीला लाभलं पाहिजे हेच स्त्रीवादाचं सोपं आणि मुख्य सूत्र आहे. असे स्वातंत्र्य स्त्री/पुरुषांच्या एकत्रित सहभागानं, सहजीवनात दोघांनाही लाभावं यासाठीचा आग्रह स्त्रीवाद धरतो. परस्परांना असा मुक्त अवकाश पुरवणं आणि एक अर्थपूर्ण, सुंदर, प्रेममय जीवन जगता येणं हेच मानवी जीवनाचं अंतिम श्रेयस आहे असं मला वाटतं. मात्र स्त्रियांची कविता तुलनेनं अभिव्यक्तीच्या एका साच्यात अडकून पडली आहे, स्त्रीवादी कविता म्हणजे केवळ स्त्री शोषण आणि स्त्रीदुःखाचं गाऱ्हाणं मांडणं असा एक समाज झाला आहे. कवयित्रींनी त्यातून बाहेर पडून आपला भोवतालाही नीट जाणून घेतला पाहिजे. आपल्या वास्तवाचं भान स्त्रियांच्या कवितेत पाहिजे तितकं उमटलेलं नाहीये असं मला वाटतं. या विधानातून मी स्वतःला वजा करत नाहीये, हे आवर्जून सांगायला हवं. प्रज्ञा दया पवार किंवा नीरजा आजच्या समकालीन जगण्याला थेटपणे भिडतायत, ते समकालीन भान आजच्या कवयित्रींमध्ये दिसेल असं वाटतं.

चहूअंगांनी स्वतःला जगण्याशी संबद्ध करून घेत असताना, जगणं समजून घेत असताना, भोवतालच्या सगळ्याचे पडसाद आपल्या व्यक्तित्वावर उमटत असतात. भोवताली घडणाऱ्या साऱ्या भौतिक/अधिभौतिक घटनांच्या प्रतिक्रिया भावना, संवेदना, विचार, चिंतन, तत्वज्ञान अशा विविध स्वरुपात प्रकट होत असतात.

माझ्यापुरतं सांगायचं तर, माझ्या मानसिकतेनं आणि काळानं, भोवतालानं माझं जगणं समूहलक्ष्यी बनवलं आणि माझी कविताही. लेखनाच्या पातळीवर मी भोवतालाशी सहकंप पावत राहिले इतकंच.

आजचा काळ तर असा आहे की सभोवती सुरु असलेल्या घडामोडींशी बेदखल राहून लिहिणे केवळ अशक्य आहे. म्हणूनच कदाचित आजची कविता क्वचितच आत्मलक्ष्यी होऊ शकते आहे.

मात्र आजचा काळ कवितेत पकडणे मला कठीण जाते आहे. कवितेची संगत सोबत कधी धीराची तर कधी जीवघेणी ठरते आहे. एकतर झपाट्यानं बदलणारा भोवताल अत्यंत गुंतागुंतीचं, भोवंडून टाकणारं वास्तव आपल्यासमोर आणत आहे. आजचा वर्तमान तातडीनं भूतकाळात जमा होतो आहे आणि मला वर्तमानाशी आपला सांधा तुटत चालल्याची जाणीव होते आहे. म्हणजे कॉम्प्युटर्स आले - आम्ही ते शिकून घेतलं. मोबाईल्स आले - आम्ही तेही शिकून घेतलं. ऑर्कुट, फेसबुक, व्हॉटस्-अॅप, नवनव्या सोशल साईटस्, रोज नवी गॅजेटस्, रोज येणारे नवे ब्रँडस् आणि जुनं ताबडतोब भंगारात जाणं याच्याशी जुळवून घेता घेता दमछाक होते आहे. नव्या जगाच्या कितीतरी गोष्टी आपल्याला समजतच नाहीयेत ही जाणीव मनाला कुरतडतेय. हे व्यक्तीगत, तर बाहेर भयंकर भ्रष्टाचार, हिंसाचार, दहशतवाद, जात, धर्म, वंश, प्रदेश, देश, भाषा, लिंग अशी सर्व प्रकारची उसळलेली विषमता, कट्टरवाद, स्वार्थलोलुपता आणि व्यक्तिकेंद्रितपणा या सगळ्याचं क्रूर टोक गाठलेला समाज पाहताना भयानं जीव घुसमटून जातो आहे. या गुंतागुंतीच्या जगण्यात स्वतः आकंठ बुडालो असताना याचा अन्वय लावणं खरोखरीच कठीण होत आहे.

दुसरं म्हणजे व्यक्त होण्याची भाषा. ज्या भाषेत हे सारं पकडायचं ती भाषा कोणती हे समजेनासं झालंय. खरं तर आज समकालीन कवितेचा एक मोठा प्रवाह समर्थपणे वर्तमानाचा गाभा पकडताना दिसतोय. परंतु मला स्वतःला मात्र भाषेसाठी चाचपडावे लागते आहे. तरीही माझी संवेदनशीलता, थोडेफार आकलन आणि समकालीन कवितेच्या प्रवाहाने पुरवलेली उर्जा या शिदोरीवर माझी नवी कविता लिहिण्याची लढाई लढत आहे.

तशीही भाषिक अडचण मला नेहमीच भासत आली आहे. जे लिहायचे ते अचूकपणे लिहिता आले नाही, ही खंत मला नेहमीच आहे. माझ्या कवितेत नव्या प्रतिभा, प्रतिमांची, अभिव्यक्तीची व्यामिश्रता, शब्दाकळेची झळाळी नाही किंवा रुपबंधाचा मी फारसा विचार केलेला नाहीये, हे मला कबूल करावं लागेल. अनुभवातील उत्कटता किंवा संवेदनांचा अदृश्य स्वरुपात जाणवलेला आकार भाषेत उतरवण्यासाठी मी तळमळते, पण कित्येकवेळा तो अनुभव दृश्यमान होण्यासाठी आवश्यक भाषाच मला सापडत नाही. जेवढं आत खळबळत असतं त्याच्या एक टक्का देखील अभिव्यक्तीच्या पातळीवर उतरवता न आल्याची खंत मोठी आहे. 'कविता हिमनगासारखी सात अष्टमांश पाण्याखालीच राहते' अशी माझी खंत एका कवितेत मी व्यक्तही केली आहे.

खरं सांगायचं तर स्वतःच्या कवितेकडे अलिप्तपणानं पाहून तिचं value judgement करणं ही गोष्ट फार अवघड आहे; परंतु कवीनं ते केलं पाहिजे. त्यासाठी थोड्या ज्येष्ठ जाणकारांच्या विधानांचा आधार घेता येईल. उदा. प्रा. रा. ग. जाधव यांनी माझ्या पहिल्या, 'मी एक स्त्रीजातीय अस्वस्थ आत्मा' या पुस्तकाची समीक्षा करताना लिहिलं होतं की "अंजलीबाईंची या संग्रहातील कविता अस्वस्थ पिंपळवस्ती आणि असीम समुद्राकाश या दोन टोकांमधील आंतरिक वाटचालीची भावस्थळे आहेत. इथे विशिष्ट प्रकारचे आत्मभान विशिष्ट प्रकारच्या परात्मभावाशी जुळून येते. विशिष्ट प्रकारची अंतर्मुखता विशिष्ट प्रकारच्या बहिर्मुखतेची सोबत करते." मला असं वाटतं की हा माझ्या कवितावृत्तीचा गाभाच सरांच्या भाष्यात आला आहे.

मलाही असं वाटतं की माझी कविता ही द्विकेंद्री आहे. ती एकीकडे स्त्रियांचं जगणं मरणं, तिचं संवेदनविश्व या विषयी बोलत राहिली आणि दुसरीकडे ती मानवी अस्तित्वाच्या शोधात धडपडत राहिली. सर्वस्पर्शी अस्वस्थता आणि मुक्तीध्यास हा माझ्या व्यक्तित्वाचा आणि म्हणून कवितांचा गाभा आहे असं मला वाटतं. ही मुक्ती म्हणजे कोणत्या एका गोष्टीपासून मुक्ती असे नाही तर मुक्ततेची जाणीव. ही मुक्ततेची जाणीव माझ्या आंतरिक व्यक्तित्वाचे सत्व आहे असं मला वाटतं. माझ्या तिन्ही कवितासंग्रहांमधून ती उसळी मारुन सतत वर आली आहे, अशी माझी समजूत आहे.

शेवटी आपण कविता का लिहितो ? तर मला नेहमी वाटतं की आपण जगताना वेगवेगळ्या पातळ्यांवर जगात असतो. भोवतीचं जगड्ब्याळ विश्व, असंख्य आकाशगंगा, सूर्य, चंद्र, तारे, डोंगर, नद्यानाले, झाडं, फुलं, फळं, पशुपक्षी, अफाट पसरलेला निसर्ग- आपल्याआधी अब्जावधी वर्षांपासून. आपल्यानंतरही...

आपल्या आसपास वावरणारी, नात्यानी-बिननात्यांनी, रक्तानं-बिनारक्तानं, इच्छेनं-अनिच्छेनं, प्रसंग-घटनांनी, भावना-संवेदनांनी, व्यवहारांनी, सहेतुक-अहेतुक, जोडलेली-तोडलेली असंख्य माणसं... आणि आपल्या आत - स्वतःच्या आतलं एक अतिशय गूढ, अनाकलनीय, गुंतागुंतीचं असं आंतरिक विश्व ...

या सगळ्यातलं अवाढव्यपण, विराटपण, विशालपण, औदार्य आणि संकुचितपण, अथांगता आणि उथळपण, सौंदर्य आणि कुरुपपण, भव्यदिव्यता आणि क्षूद्रपण, रौद्रभीषणता आणि नाजूकपण, क्रूरता आणि प्रसन्नपण, शांतता आणि कल्लोळ, नियमबद्धता आणि गोंधळ, सुसंगती आणि विसंगती, अर्थपूर्णता आणि निरर्थकत्व या सगळ्याशी आपण एकाचवेळी जोडले आणि जखडले जात असतो. हे जोडलेपण आपल्याला हवं असतं आणि नसतंही. या जखडण्यातून तर आपली सुटकाच नसते. या सगळ्या जोडण्या-जखडण्याच्या ताणतणावातून, संघर्षातून, अस्वस्थतेतून या सगळ्याचा अर्थ शोधण्याचा ध्यास आपल्याला लागतो. त्यातून आपली कविता जन्म घेत असते. मला तर वाटतं जगण्याचं decoding करत राहणं म्हणजे कविता लिहिणं. दुःखाची दुखरी नस नेमकेपणानं उचलून चिमटीत पकडण्याचा प्रयत्नात कवितालेखनाचा प्रवास सुरु राहणं हेच मला वाटतं कवीचं भाग्य आणि भागधेयही असतं