"मी : एक स्त्रीजातीय अस्वस्थ आत्मा " , अस्वस्थ मनाची संवेदनशील कविता - प्रा. रा. ग. जाधव

रविवार, दिनांक ७ जानेवारी १९९६ , महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेल्या पुस्तक परीक्षणातील काही भाग

अंजलीबाईंची कविता एका स्त्रीजातीय अस्वस्थ अत्म्याचीही आहे आणि एका आत्मभान जपणाऱ्या व्यक्तीचीही आहे. जागे होणारे स्त्रीत्व व जागे होणारे निखळ माणूसपण यांच्या जाणिवांची ही कविता आहे. या कविता अपरिहार्यतेच्या पिंपळावर वस्ती करून राहणाऱ्या एका अस्वस्थ स्त्रीजातीय आत्म्यापासून प्रस्थान ठेवतात आणि शेवटी एका नव्या आत्मप्रतीतीपर्यंत येऊन पोहोचतात. हा आत्मिक कायापालट मोठा अर्थपूर्ण आहे:
आताआताशा मी स्वतःला
नव्यानेच जाणवू लागले आहे
म्हणजे असं की मी म्हणजे
नुकतंच जन्मलेलं एक तान्हुलं
आणि सारं विश्व नव्याने
झळाळून उठते आहे...
स्त्रीच्या आत्म्याचे हे नवे आशावादी विश्व कवयित्री बघते आहे. एक तान्हुले नि झळाळून उठणारे नवे जग हे, खरे तर, एका नव्या माणसाचे व त्याच्या अभिनव विश्वाचे स्वप्नं आहे आणि त्यात लिंगभेदातीत असा नवा माणूसच केंद्रस्थानी आहे. तिच्या नजरेत ज्ञानसुलभ कुतूहल आहे. नव्या विश्वाचा एक असीम समुद्र ती नजरेच्या कवेत घेऊ पाहत आहे. चिंतनगंभीर आकाशाचा एक तुकडा स्वतःपुरता काबीज करू बघत आहे. तिच्या या परिवर्तन-पर्युत्सुक अवस्थेला कुण्या एकाचे (परमेश्वराचे) बळ हवे आहे, आकार देणारा कसबी हात हवा आहे हेही खूपच अर्थपूर्ण वाटते.

'आताआताशा मी स्वतःला नव्याने जाणवू लागले आहे आणि स्त्री ही नव्या जगाची जननी आहे', असे अंजलीबाईंनी म्हटले आहेच. खोल अंतर्यामातून आणि उत्तुंग अंतराळातून उमटलेल्या या दोन्ही विधानांचा अर्थ विशद करणारी प्रत्ययकारी कविता त्यांनी यापुढे लिहावी, हीच इच्छा विद्यमान कवी व कविता यांच्या वर्णमालेत फक्त अ म्हणजे खोलातील मी आणि क्ष म्हणजे विराट अंतराळ एवढेच दोन वर्ण असतात, असे म्हटले जाते. कवितेची अर्थपूर्णता खरी तर या दोहोमधील वर्णपटातच असते. - अंजली कुलकर्णी यांना हेही माहित आहेच .. !

"हृदयस्पर्शी ", संवेदनांना समृद्ध करणारे ललित लेखन - डॉ. कल्याणी हर्डीकर

रविवार, दिनांक २५ जून २०००, सकाळ मधील पुस्तक-परिचय

अंजली कुलकर्णी यांचे 'हृदयस्पर्शी' हे ललित गद्याचे पुस्तक. यात एकूण तेवीस ललितलेख आहेत. कवयित्रीची प्रखर संवेदनक्षमता अंगी असल्यामुळे त्या जीवनाकडे सखोल आणि सूक्ष्मपणाने पाहू शकतात. जगण्याचा, मरण्याचा, विषयवासनेचा अन्वयार्थ एका वृत्तिगांभीर्याने घेऊ शकतात. तेवीसमधल्या बऱ्याचश्या ललित लेखांचे विषय हे जन्मणे, मरणे आणि वासनांची विविध विकारविलसिते आहेत. या सर्वानी जखडलेले आयुष्य जगणारी माणसे, त्यांचे वर्तनव्यापर लेखिकेला कसे विचारप्रवृत्त करून जातात याच्या कथा म्हणजे हे ललित गद्य आहे. जीवनाबद्दलचे काही विचार, काही प्रतिक्रिया, काही घटना-प्रसंग, काही व्यक्ती तिने यात नोंदवल्या आहेत. काही वेळेला हे लेख लघुकथेच्या अंगाने फुलतात, तर इंद्रनील, पुन्हा तो सारखे लेख मुक्तछंदातल्या कवितांसारखे लिहिले जातात. बुद्धी, तर्क, भावना, संवेदना यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करणारे हे ललित लेख आहेत हे निश्चित. श्रीकृष्ण ढोरे यांचे मुखपृष्ठ लेखांना अधिक अर्थवाही बनवणारे आहे.

"मी : एक स्त्रीजातीय अस्वस्थ आत्मा " , अस्वस्थ आत्म्याची चिंतनशील गाथा - डॉ. अनुराधा पोतदार

रविवार, दिनांक ९ जून १९९६, सकाळ मधील पुस्तक परीचयातील काही भाग

व्यक्तिगत आणि व्यापक पातळीवरील कवयित्रीची अंतस्थ अस्वस्थता तिच्या कवितेमधून उत्कट समर्थपणे व्यक्त होत असून, सामान्यत: स्त्रीवादी (?) कवितेच्या आक्रस्ताळी, एकांगी, आणि अनुभूतीच्या पृष्ठभागावरच वावरणाऱ्या वरपांगी अभिव्यक्तीसारखी ती ढोबळ आणि सवंग वाटत नाही. स्त्रीमनाची व्यथा, तिची कोंडी आणि कोंडमारा तर इथे उत्कटतेने स्वगतासारखा अपरिहार्य होऊन व्यक्त होतोच. उदा: 'ठरवून दिलेल्या भ्रमणकक्षेत असह्य फिरत राहण्याचा शाप मी भोगते आहे.' परंतु या तात्कालिक असहायतेबरोबरच, 'मला माहित आहे, राम नाही करू शकणार, अहिल्या स्वतःचा उद्धार स्वतःच करणार आहे.' ही आशावादी भविष्यवाणीही तिच्याच शब्दातून उमटते. या कवितेमधून व्यक्त होणारी व्यथा आणि अनुभूती केवळ कवितेच्या वेशीवर टांगलेले सवंग आणि सनातन गाऱ्हाणे या स्वरूपात जाणवत नाही, तर ती या व्यथेच्या पलीकडील अंतर्मुख, चिंतनशीलतेच्या पातळीवरही चढते आणि तसे चढताना मानवी जीवन, मानवी मन आणि स्त्रीपुरुषांतील अतूट नात्याविषयीही अनेक प्रश्न सहज ओघात स्वगताच्या सहजतेने शब्दांकित करते. अंतर्यामी जाणवणाऱ्या त्या दारुण प्रश्नांनी ती अस्वस्थ झाली तरी अंतिम निराशेच्या अधीन होत नाही.

सहसा विवश किंवा भावूक न होणारी ही कविता निखळ जगण्यामधूनच येणाऱ्या विवेकी शहाणपणाचाही खोल प्रत्यय रसिकाला देते. विवेकी, अंतर्मुख सुज्ञतेनेच तिला भविष्याचा वेध घेणारी दृष्टीही दिली आहे. हा वेध केवळ स्त्रीत्वाचा नाही, तो या भयानक वास्तवातही आपले अस्तित्वभान जपणाऱ्या माणसाचाही आहे. 'सोपे नसते जगणे, तरी माणसे जगात राहतात, जगण्याच्या अर्थालाच कधी कृतार्थ करून जातात' हे दिलासा देणारे सत्यही तिला गवसले आहे.

मितभाषी तीव्रतेने आणि तितक्याच संवेदनशील अंतर्मुखतेने कवितेतून व्यक्त होणारे हे जीवनाचे, नव्हे, अवघ्या अस्तित्वाचेच जीवघेणे भान रसिकालाही चिंतनमग्न करते- या कवितेचे हेच यश आणि हेच तिचे बळही.

"पोलादाला चढले पाणी" , परीक्षण

रविवार , दिनांक ९ डिसेंबर २००१, लोकसत्ता मधील आगमन सदरातील परीक्षण

अस्त्रोवस्की यांच्या 'काक झकल्यालस स्ताल' या रशियन कादंबरीचे अंजली कुलकर्णी यांनी मराठीत संक्षिप्तीकरण केले आहे. कम्युनिस्ट युवक-युवतींनी दिलेल्या झुंझार लढयाविषयी, त्यांच्या त्यागाविषयी ही कादंबरी आहे. या कादंबरीचा नायक पावेल कोर्चागिन हा अन्यायाविरुद्ध झगडणाऱ्या तरुणांचा प्रतिनिधी आहे. त्याच्या झुंझार जीवनाला केंद्रस्थानी ठेऊन ही कादंबरी लिहिली आहे.

"संभ्रमाच्या पाण्यात गटांगळया", असण्याचे सुंदर ओझे - रुपाली शिंदे

रविवार, दिनांक २३ सप्टेंबर २००६, सकाळ सप्तरंग मधील परीक्षणाचा काही भाग

या लेखांमधून व्यक्त होणाऱ्या अनुभवांमध्ये प्रसंग निमित्तमात्र होतो आणि त्या निमित्ताने फुटणारे विचारांचे धुमारे महत्वाचे होतात. विचारांचे भोवरे, उसळणाऱ्या लाटा असे त्यांचे स्वरूप नाही. संथ, ठाम लयीत पूर्ण होणारा विचारांचा प्रवास हे त्याचे वैशिष्टय आहे.

संग्रहातील लेखांना साधा माणूस म्हणून जगण्याच्या चाकोरीचा संदर्भ आहे; तसेच चाकोरीपेक्षा स्वतःमधील नव्या जाणिवा, नव्या शक्तीची स्पष्ट जाण असणारे मनही आहे. या दोन बाजूंनी चाललेला आत्मसंवाद, आत्मशोध, दैनंदिन व्यवहारातील घटनांची पाळेमुळे खणत जायची धडपड करतो. मानवी नात्याच्या तळाशी उरणारा जगण्याचा अर्थ शोधून, अर्थपूर्ण जगणे म्हणजे काय असा प्रश्न या संग्रहातील लेखांमधून उभा राहतो.

या संग्रहातील काही लेख प्रतीकरूप घेउन आले आहेत. नेहमी पडणारी स्वप्नं, चंद्रोदय-चंद्रास्त, तेजस्वी इंद्रनील, अलीबाबाची गुहा हेच काही लेखांचे विषय होतात. माणसाच्या सुप्त मनातले व्यवहार, रूढ जगण्याचे व्यवहार आणि खोलवर शांततेचा अनुभव देणारा मुक्तीचा आत्मप्रत्यय या लेखांमध्ये उत्कट कवितेप्रमाणे व्यक्त होतात. उत्कट संवेदनशीलता, जगण्याची रूढ चाकोरी ओलांडून जगण्यातले मार्दव जपण्याची ओढ, सौजन्यशील मन, मुळचा कवीधर्म अशी सारी वैशिष्टये या लेखांमध्ये दिसतात.

"बदलत गेलेली सही", परीक्षण - प्रा. सुहासिनी किर्तिकर

एप्रिल, २०१० ललित माधील लेख.

फार फार अवकाशानंतर एक दळदार कवितासंग्रह हाती आल्याचं समाधान 'बदलत गेलेली सही' ने दिलं. 'स्व-ओळख' सांगणाऱ्या या कविता 'स्त्री'च्या कविता आहेत. 'स्त्रीवादी' वगैरे म्हणूया नकोच. स्त्री कितीही पुढारली, आधुनिक झाली, शिकलीसवरली, नोकरोची क्षितिजं स्वकर्तृत्वाने विस्तारत गेली, संसारात यशस्वी ठरली तरी सनातन मनानं तिचा 'परीघ' ठरवूनच दिलेला आहे. म्हणूनच मग 'असून निगराणी, देऊनिया पाणी' ' केळीचे सुकले बाग' अशीच अवस्था तिच्या भावविश्वाची आहे. हेच वास्तव 'स्व'च्या पध्दतीनं 'बदलत गेलेली सही' मध्ये साकारलं आहे.

'आपण मोठे होत जातो, जग आपले छोटे होते', 'आपल्यासारखेच जगलेल्यांच्या आपण झेरॉक्स कॉप्या होतो' - हे असे गज स्त्रीच्या भोवती आहेत. 'कुणी केलीये मला जगण्याचे सक्ती?' म्हणत ती 'दळू लागते स्वतःला' तेव्हा कागदावर ते उतरवण्यासाठीही तिला भीती वाटत राहते. 'डाळतांदूळ मेथी पालकातून' बाहेर पडणं जमतच नाही तिला, मग ती 'सतत परिघावरच' आपली! 'एक उद्दाम दांडगा माणूस' कधी नवरा बनून, कधी बॉस बनून तिच्या 'बदलत गेलेल्या सही'ची किंमत शून्य करून टाकतो. या परिघाच्या बाहेर असलेली स्त्रीची पुरुषाशी निर्मळ मैत्री 'पण कित्येक वेळा आपण पुरुष नसतो की स्त्री' अशा रूपात परस्परांना संवादातून 'चैतन्य' पुरविते.'- मात्र ही अशी मैत्री म्हणजे देखील 'ताडीच्या झाडाखाली बसून दूध प्याल्यासारखे !' लोक म्हणतात, 'हे ताडीच पिताहेत'. प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको यांचे भावसंबंध शरीरांच्या 'डेडएंड' पर्यंत येतात; तेव्हाची स्त्रीमनाची वाताहत, पराभूतपणाची भावना, एकमेकांमध्ये पसरणारी 'दाट धुक्याची भिंत' फार सूचकपणे आणि चपखल मांडणीतून काव्योत्कट होत जाते. 'निमूट आदेशपालन नि त्वरित नादमय, संथ श्वासोच्छवसन' मधून शरीरमीलन आणि त्यानंतरची 'तिचा मात्र कोसळून पडतो आतला जीव' ही तिची ठसठस - अनेक कवितांमधून असा 'आतला जीव' अंजली कुलकर्णी यांना त्या जीवाच्या बारीकसारीक भाव्स्पंदनांनसह प्रत्ययास आणता आला आहे. 'दुःखाचं बाळ', 'पेशींच्या अनावर हाका' ऐकत जन्माला येतं; ते अशा अनेक कवितांमधून. 'आपण असतो सगळेच निव्वळ परिस्तिथीचे बळी' - हेही मग उमगत जातं. या संग्रहातून, या कवितांतून निरामय कविता अशी भेटत राहते, मनाला कवेत घेते; तेव्हा वाचकांच्या संवेदनापेशीही त्यात एकजीव होत जातात.

"संभ्रमाच्या पाण्यात गटांगळया", दर्जेदार ललित लेखांचा संग्रह - आसावरी काकडे 

रविवार , दिनांक २५ मार्च २००७, केसरी मधील लेखातून

पुस्तकाच्या शीर्षकातूनच सूचित होत आहे की आतील लेखन गंभीरपणे विचार करायला लावणारं आहे. आपल्या भोवतीच्या पर्यावरणाविषयी आंतरिक आस्था असेल आणि पुरेशा सजगतेनं सगळं समजून घेत असेल कुणी, तर मन व्याकुळ होतं . 'असं का?' हा प्रश्न सतत छळत राहतो. या अवस्थेला प्रतिसाद म्हणून दोन स्तरांवर 'उत्तरं' शोधायचा प्रयत्न होतो. एक तात्कालिक कारण शोधून, तपशिलात शिरून उपाय करणं किंवा सगळ्यामागचं तात्विक कारण शोधणं , आदिम तत्वांचा वेध घेणं ... अंजली कुलकर्णी थोडयाफार प्रमाणात दोन्ही स्तरांवर विचार करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या प्रयत्नाचं माध्यम आहे लेखन ! 'कविता' हे त्यांचं पाहिलं प्रेम असलं तरी ललित लेखांसारखं मुक्तचिंतनाला अवकाश देणारं माध्यमही त्या सामर्थ्यानं हाताळतात.

यातील लेखनाचं स्वरूप एखाद्या रोजनिशीसारखं, स्वागत असावं, तसं आहे. कारण त्यात रोजच्या जगण्यातील छोटयामोठया घटनांविषयी मनात उमटणाऱ्या कल्लोळांचं चित्रण आहे. असंख्य 'का?' यांनी गढूळलेल्या संभ्रमाच्या पाण्यात गटांगळ्या खाताना येणाऱ्या भयंकर अस्वस्थतेचं शब्दांकन म्हणजे यातील लेखन आहे. या संग्रहातील लेखनात विविध विषय येतात. उदा. एकांत-एकलेपण, निर्णयस्वातंत्र्य, शरीराची कहाणी, नात्यांचं जुळणं-तुटणं, संत काळातील कविसंमेलनं, पाऊस... इ. पण सर्व लेखांत एक अंतःसूत्र आहे - उत्कटतेनं मानवी जगणं, असणं, समजून घेणं!

'संभ्रमाच्या पाण्यात गटांगळया' या लेखसंग्रहात संवेदनशीलता विचारांचं बोट धरुन येते आणि मुक्त चिंतनाला सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती मिळते. त्यामुळे संग्रह दर्जेदार झाला आहे. ज्येष्ठ लेखक रविंद्र पिंगे यांची प्रस्तावना ही या संग्रहाची जमेची बाजू.

"संभ्रमाच्या पाण्यात गटांगळया", चिंतनगर्भ ललितलेख; प्रत्येक क्षण आनंदमय करण्याची आंतरिक ओढ - शंकर सारडा

शंकर सारडा यांचे परीक्षण

मी एक स्त्रीजातीय अस्वस्थ आत्मा, संबद्ध हे काव्यसंग्रह आणि हृदयस्पर्शी हा ललितलेखसंग्रह याद्वारे अंजली कुलकर्णी यांनी एक चिंतनशील साहित्यकार म्हणून आपली मुद्रा चोखंदळ रसिकांवर उमटवली आहे. स्त्री म्हणून 'स्व'त्वाची ओळख होणे आणि एकूणच आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधणे यातून त्यांचे काव्य स्फुरले आणि ललितलेखन बहरले. त्या 'अस्वस्थ'तेतूनच विविध वाङ्मयीन उपक्रमातही त्या सहभागी होतात आणि आपल्या समानधर्मी साधकांशी संवाद साधू पाहतात.

'संभ्रमाच्या पाण्यात गटांगळया' ह्या त्यांच्या ताज्या ललितलेखसंग्रहातील 'शोध-ध्यास आदितत्वाचा', 'एकान्ताची ओढ आणि एकलेपणाशी सामना', 'शरीराची कहाणी', 'नात्यांचं जुळणं - नात्यांचं तुटणं', 'प्रणय-ओथंबून आलेलं ओलं आभाळ', 'मला दिसलेला पुरुष' ही काही शीर्षके बघितली तरी अंजली कुलकर्णी यांच्या चिंतनगर्भ शोधात्मकतेची खूणगाठ पटेल. आपले पृथगात्म व्यक्तित्व, आपले सामाजिक संदर्भ, आपले अस्तित्व, आपली कलानिर्मिती साधना, आपले देहभान, आपली नाती यांचे स्वरूप जाणून घेण्याचा तलस्पर्शी प्रयत्न या लेखनप्रक्रियेत दिसतो.

'संभ्रमाच्या पाण्यात गटांगळया' या लेखात तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलामुलींच्या मनातील भिन्नलिंगी व्यक्तिविषयक ओळख, आकर्षण, मैत्री, प्रेम या भावनांच्या संभ्रमाचं जे काहूर माजलेलं असतं, त्याचं स्वरूप हळुवारपणे उलगडून दाखवण्यात आलं आहे. हे नातं परिचयाचं असो, मैत्रीचं असो की प्रेमाचं असो ते क्लिक व्हावं लागतं. त्यातील शारीरिकता किंवा लैंगिकता आणि शरीरनिरपेक्षता (प्लेटॉनिक लव्ह) यांच्या बद्दलही स्पष्टता असावी लागते. एकत्रितपणे केलेलं सामाजिक, वाङ्मयीन, सांस्कृतिक, विधायक निर्मितीक्षम काम हे देखील 'सामागमाइतकाच किंवा त्या तोडीचा' आनंद देऊ शकतं असं त्या सुचवू पाहतात. शारीरिक नात्याचा बाऊ करण्याचं कारण काय असा प्रश्नही त्या विचारतात. एकतर्फी प्रेम व त्यातील निराशेपोटी होणाऱ्या आत्महत्या वा प्रिय व्यक्तीची हत्या हा सध्याचा एक मोठा सामाजिक प्रश्न आहे. त्यामागे पुरुष असणं आणि श्रेष्ठ असणं हे समीकरण प्रभावी ठरते याकडेही त्या लक्ष वेधतात. फ्रेंडशीप आणि लव्ह्शीप यातील फरक समजण्याएवढी प्रगल्भता हवी. हिंदी सिनेमातल्या नायकनायिकांची रोलमॉडेल्स प्रेमभावनेचं हिंसेत, विकृतीत, विद्रूपतेत रूपांतर करतात; प्रेमभावनेचा आदर करायला शिकायला हवे; स्वतःच्या मनात नेमकी काय भावना आहे हे समजून घेऊन दुसऱ्याशी असणारं नातं किती फुलू-वाढू द्यायचं ते ठरवायला हवे; अर्थात आपल्या अंतर्यामीच्या पेशींच्या अनावर हाका, रक्ताच्या उसळणाऱ्या लाटा आणि त्यात खाल्लेल्या गटांगळया यांची उत्स्फूर्तता आणि आवेग हा तर्कापालीकडचा असतो; माणूसपणाची पातळी न सोडण्याचं भान ठेवून त्या उत्स्फूर्त आवेगाला अवसर देणे हेच श्रेयस्कर असा इशाराही त्या देतात.

अशा व्यापक भूमिकेतून एकूणच मानवी व्यवहाराकडे पाहण्याचा समंजसपणा अंजली कुलकर्णी यांच्या चिंतनाला गहिरी डूब देतो. संभ्रमापलीकडे जाण्याची दिशा स्पष्ट करतो. निरागस, नैसर्गिक आविष्काराचा, खऱ्याखुऱ्या प्रकटीकरणाचा आनंद समंजसपणाच्या वा प्रगल्भतेच्या नावाखाली दाबून ठेवण्यातला वैयर्थही दाखवून देतो. शरीराच्याच माध्यमातून शरीराच्या पार जाऊन अंतरात्म्याची ओळख पटवणाऱ्या चैतन्यमय आनंदाचा अनुभव घेण्याची आकांक्षा बाळगतो. आदिम शक्तींच्या प्रगाढ एकरूपतेचा असा शब्दातीत अनुभव म्हणजे गुलबकावलीचं फूल गवसण्याचा दुर्मिळ भाग्यक्षण .. असं म्हणताना शिवशक्तीच्या मीलनाचं विराट वैभव त्यांना समोर खुणावत असतं.

जगणे हे खूप गुंतागुंतीचे आहे. निवडीचे स्वातंत्र्य येथे आहे; परंतु मानवी स्वातंत्र्याला अनेक मर्यादांची चाकोरी जन्मापासूनच लाभलेली असते; ती निर्णयस्वातंत्र्याची गोची करते ... त्यात पुन्हा काल हा घटक घोळ घालतो... आज जे चांगले वाटते, म्हणून करावेसे वाटते तेच उद्या निरर्थक वाटू लागते... तेव्हा निर्णयस्वातंत्र्याच्या निरर्थकपणाचं ओझं न बाळगता, प्रत्येक क्षण आनंदमय करायचा हाच ध्यास आयुष्याला सुफळ संपूर्ण बनवील असा पोक्त निष्कर्षही 'निर्णयस्वातंत्र्य - इसके सिवा जाना कहाँ' यासारख्या लेखातून त्या पुढे ठेवतात. 'सूर्य पाहिलेला माणूस - सॉक्रेटीस' या लेखात सत्याचा शोध हाच ध्यास घेणाऱ्या सॉक्रेटीसच्या निखळ निर्भयतेचे दर्शन घडवले आहे.

रवींद्र पिंगे यांनी आपल्या प्रस्तावनेत अंजली कुलकर्णींचं ललितलेखन समकालीन लेखिकांपेक्षा वेगळे व वेगळ्या धावपट्टीवरचे आहे असे म्हटले आहे. ते कोणाही वाचकाला पटायला हरकत नाही. तत्वज्ञानाच्या आणि समाजशास्त्राच्या अॅकॅडमिक अभ्यासाची जोड मिळाली तर अंजली कुलकर्णी यांच्या चिंतनाच्या कक्षा अधिक विस्तृत आणि काटेकोर होऊ शकतील. छोटेखानी स्फुट ललितलेखांच्या मर्यादेत होणारी त्यांची घुसमट त्यामुळे थांबू शकेल. ही धावपट्टी लांबपल्ल्याच्या उड्डाणासाठी आहे; हे सूचित करणारा हा संग्रह आहे.

"संबद्ध", व्याकुळतेचे अलवार आविष्करण, प्रा. डॉ. वसंत बिरादार

रविवार, दिनांक २१ नोव्हेंबर १९९९, दै. लोकमत मधील ग्रंथायन सदरातून

अंजली कुलकर्णी यांचा 'संबद्ध' हा काव्यसंग्रह. यातून स्त्रीमन व्यक्त झाले आहे. हे मन पुरुष व स्त्री यांच्या दुरान्वयापासून तर कधी समन्वयातून साकार होते. संवेदनशील मनाची स्त्री वेदनेची मूर्ती, झाड कशी बनते याचे चित्रणही दृगोचरीत होते. याच बरोबर स्त्रीमनाचे समग्र भावविश्व, व्याकुळ व वेदनामय जीवनाचे चित्रण, सर्जनशील मनाचा विविधांगी व विमुक्ततेचा प्रत्यय, कधी निराशेचा प्रत्यय, कधी वैफल्याचा प्रत्यय तर कधी अगतिकतेचा प्रत्यय व तोही दारुणपणे येतो. घराच्या कल्पनेभोवती गुंतलेले कविमन, व्यक्त झालेले सूचक भाव, स्त्री मनाच्या भावविश्वातला पती, त्याचा वेध घेण्याचा केला गेलेला प्रयत्न, स्त्री-पुरुषांच्या विसंवादाचे चित्रण, त्याचे स्वरूप, स्त्रीच्या मनोधर्माचे स्वरूप, जपलेल्या विविध आठवणी, त्याची विविध रूपे, उत्कट अभिव्यक्ती, निवेदनातून व्यक्त झालेले व्याकूळ व वेदनामय जीवनाचे चित्रण अलवारपणे येते.

मराठीच्या शब्दसृष्टीमध्ये 'संबद्ध' (जोडलेला), 'संबंध' (नाते) व 'सबंध' (सगळाच्या सगळा) असे तीन अक्षरी तीन शब्द आढळून येतात. वरवर अर्थ एक नाही. पण 'शब्द' मात्र जवळजवळ सारखेच वाटतात. अंजली कुलकर्णी यांच्या या काव्यसंग्रहाचे शीर्षक 'संबद्ध' म्हणजे जोडलेला याच अर्थाने आपल्याला स्वीकारावा लागेल. यातील नायिका आपला प्रियकर, पती यांच्याशी मनोमन जोडली गेलेली आहे. आयुष्याचे, जगण्याचे, जगता जगता हिरावले गेलेले, राहून गेलेले सारे काही, तिच्या जीवनात आलेल्या आपल्याच व्यक्तीने पूर्वायुष्यातील तुकडे गोळा करून सप्रेम भेट म्हणून हिचे जीवन विविध रंगगंधानी उजळून निघते. 'तो' तिला सुवर्णचाफा भासतो. येथेच 'तिचे' त्याच्याशी नाते 'जोडले' जाते. पण हा जोडलेपणा, संबद्धपणा वरवर एकरूप वाटत असला तरी तो पोखरला गेला आहे.